सारांश: सौर-उर्जेचे महत्व ओळखून मुबलक सूर्यप्रकाश असलेल्या देशांचा गट ‘आंतरराष्ट्रीय सौर-ऊर्जा गठबंधन (International Solar Alliance)’ स्थापन करण्यात पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतला होता. त्याच संदर्भात, भारत आणि फ्रान्स यांनी ११ मार्च २०१८ रोजी दिल्ली येथे पहिले आंतरराष्ट्रीय सौर-ऊर्जा गठबंधन परिषदेचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा गठबंधन स्थापन करून भारताने शाश्वत विकासाबद्दल आपली बांधिलकी दर्शवली आहे तसेच पुन्हा एकदा आपण बहुराष्ट्रीय संस्थात्मक विदेशनीतिचा पुरस्कर्ता असल्याचे अधोरेखित केले आहे. परंतु सौर-ऊर्जा जरी सस्टेनेबल अथवा पर्यावरणपूरक असली तरीही सौर फोटोव्होल्टाइकचा (Solar Photovoltaic) कचरा मात्र तितकासा इको-फ्रेंडली नाही, त्याची रिसाइक्लिंग (पुनर्वापर) प्रक्रिया आणि विल्हेवाट किचकट आहे. त्यामुळे इकोफ्रेंडली सौर पीव्ही बद्दल संशोधन होण्याची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय सौर-ऊर्जा गठबंधन (ISA)
पारंपरिक ऊर्जा मानव, पर्यावरण व पृथ्वी यांना हानीकारक असून वेगाने वाढणारी मागणी बघता भविष्यात पारंपरिक ऊर्जा अपुरी देखील ठरणार आहेत. सौर-ऊर्जा मात्र कधीही न संपणारी (अक्षय) व आपल्या देशात मुबलक असून शाश्वत विकासाला पूरक आहे. ज्याप्रमाणे तेलाच्या बाबतीत आखाती देश, परदेशी जहाज कंपन्या, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार अशा अनेक घटकांवर आपण अवलंबून असतो तशी परिस्थीती सौर ऊर्जेच्या बाबतीत नाही. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी सौर ऊर्जा हा एक उत्तम पर्याय आहे.
सौर उर्जेचे महत्व ओळखून मुबलक सूर्यप्रकाश असलेल्या देशांचा गट तयार करण्यात पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतला. आंतरराष्ट्रीय सौर-ऊर्जा गठबंधन हे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्यामध्ये असलेल्या राष्ट्रांचा गट असून याची कल्पना व स्थापना पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी २०१५ मध्ये पॅरिस पर्यावरणबदल करारादरम्यान केली होती (COP21). त्यानंतर बरोबर एक वर्षांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये माराकेश पर्यावरणबदल परिषदेदरम्यान (COP22) आंतरराष्ट्रीय सौर-ऊर्जा गठबंधनाचा आराखडा सदस्य राष्ट्रांसमोर मांडण्यात आला. आजवर, भारतासहित ६१ देशांनी सौर करारावर स्वाक्षरी केली आहे.
पहिली आंतरराष्ट्रीय सौर-ऊर्जा गठबंधन परिषद
दिल्लीमधील प्रथम सौर-ऊर्जा परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्राॅ या यजमानांसहित ५८ देशांचे उच्च प्रतिनिधी, १०० पेक्षा जास्त देशातील, तज्ञ, संशोधक, संयुक्त राष्ट्रसंघ व इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक इत्यादी सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज (भारत), फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो आणि इतर मान्यवरांनी परिषदेला संबोधित केले. स्वराज म्हणाल्या की आर्थिक वाढ आणि शाश्वत विकास परस्परविरोधी नसून पूरक आहेत, दोन्ही गोष्टी साध्य करणे आवश्यक आहे. भारताने सौरऊर्जा गठबंधनासाठी 27 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची तरतूद केली असल्याचे त्यांनी जाहीर केले (स्वराज यांचे संपूर्ण वक्तव्य).
सौर मातांनी (Solar Mamas) गायले हम होंगे कामयाब हे गीत
सौर माता वा सोलर ममाजनी गायलेले हम होंगे कामयाब हे गीत या परिषदेतील एक वेधक घटना. सौर माता अथवा सोलर ममाज म्हणजे भारत सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सौर-ऊर्जा उभारणी व वापराचे प्रशिक्षण घेतलेल्या विकसनशील देशांमधील महिला. या तळागाळात काम करणाऱ्या महिलांचं प्रशिक्षण बेअरफूट महाविद्यालय, तीलोनिया (अजमेर, राजस्थान) येथे झाले असून, त्या आपापल्या देशातील विविध सौर-ऊर्जा कार्यक्रमात कार्यरत झाल्या आहेत.
सौर उर्जे बाबत पंतप्रधान मोदींचा दहा कलमी कार्यक्रम
मोदी यांनी वेदांमध्ये सूर्याला विश्वात्मा, हिरण्यगर्भ, ऊर्जा आणि जीवनाचा शाश्वत स्रोत मानले असल्याचे सांगून आज वातावरण बदलाचा जो धोका आहे तो टाळण्यासाठी सूर्य-क्रांतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले की आज भारतात २० GW शाश्वत ऊर्जेची निर्मिती होत असून २०२२ पर्यंत १०० GW सौर ऊर्जेसह १७५ GW शाश्वत ऊर्जेची निर्मिती करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे (मोदी यांचे संपूर्ण वक्तव्य). सौर-ऊर्जा गठबंधनासाठी स्वराज यांनी सांगितलेल्या तरतुदी व्यतिरिक्त भारताने आणखी ६२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची तरतूद केली आहे. सौर उर्जे बाबत मोदींनी दहा कलमी कार्यक्रम प्रस्तुत केला तो असा:
1. उत्तम, सोपे, स्वस्त सौर तंत्रज्ञान 2.पारंपरिक उर्जे ऐवजी सौरऊर्जेचा वापर 3. कल्पक संशोधनाला प्राधान्य 4.सौर ऊर्जा कार्यक्रमांसाठी कमी जोखीम असलेल्या आर्थिक सवलती 5.सौर ऊर्जेबाबत धोरणे आणि नियम 6.व्यवहार्य सौरऊर्जा प्रकल्पांकरता योग्य सल्ला मिळण्याची व्यवस्था 7.समावेश आणि भागीदारीला प्रोत्साहन 8.उत्कृष्ट गुणवत्ता असलेले सौर ऊर्जा सेवांचे व्यापक जाळे 9. सर्वंकष, शाश्वत विकासात सौर ऊर्जेचे योगदान जास्तीत जास्त होण्यासाठी विकास धोरणात सौरऊर्जा धोरणाचा सामावेश 10. व्यावसायिक आणि प्रभावी आंतरराष्ट्रीय सौर-ऊर्जा गठबंधन सचिवालय.
एकंदरीत, सौर उर्जेचे महत्व ओळखून मुबलक सूर्यप्रकाश असलेल्या देशांचा गट तयार करण्यात पंतप्रधान मोदींनी मोठा पुढाकार घेतला आहे.
भारत में वेदों ने हज़ारो साल पहले से सूर्य को विश्व की आत्मा माना है। भारत में सूर्य को पूरे जीवन का पोषक माना गया है।
आज जब हम Climate Change जैसी चुनौती से निपटने का रास्ता ढूंढ रहे हैं तो हमे प्राचीन दर्शन के संतुलन और समग्र दृष्टिकोण की ओर देखना होगा: PM— PMO India (@PMOIndia) March 11, 2018
भारत : वीजनिर्मिती आणि अपारंपरिक अथवा शाश्वत ऊर्जास्त्रोतांचा (Renewable Energy) वाढीव सहभाग
आज भारतात जगातील 18 % लोक राहतात परंतु विजेचा वापर मात्र जगाच्या फक्त 6 % आहे. वीज पुरवठा नसलेले 24 कोटी लोक आज भारतात आहेत (इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी). अर्थात भारताची अर्थव्यवस्था, लोकसंख्या आणि विद्युतीकरणही वाढते आहे. त्याचबरोबर विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणानुसार, भारताची एकूण वीज निर्मिती क्षमता 330 GWh आहे (डिसेंबर २०१७), त्यापैकी अपारंपरिक अथवा शाश्वत ऊर्जास्त्रोतांचा हिस्सा १८.२% किंवा ६० GWh आहे. सौरवीज निर्मिती 20 GWh इतकी आहे (पंतप्रधान मोदी यांचे भाषण) आहे. 2040 पर्यंत, भारताची लोकसंख्या 161 कोटी (जगातील सर्वात जास्त) तर ऊर्जेची मागणी १००० GWh होण्याची शक्यता आहे (इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी २०१५, पान ५५).
पारंपरिक ऊर्जा मानव, पर्यावरण व पृथ्वी यांना हानीकारक असून 2040 च्या ऊर्जेची मागणी बघता पारंपरिक ऊर्जा अपुरी देखील ठरणार आहेत. ही मागणी आणि निर्मिती व पुरवठ्यातील तफावत अणुऊर्जा व अपारंपरिक ऊर्जास्त्रोतच भरून काढू शकतात. सौर-ऊर्जा कधीही न संपणारी (अक्षय) व आपल्या देशात मुबलक असून शाश्वत विकासाला पूरक आहे. तसेच, सौर पीव्हींची कार्यक्षमताही आता वाढली आहे. परंतु सौर फोटोव्होल्टिकचा ई-कचरा हा भविष्यात समस्या होऊ शकतो.
सौर-ऊर्जा आणि ई-कचरा
सौर-ऊर्जा फोटोव्होल्टाइक सेल्समध्ये साठवली जाते. या सेल्सचे जीवनमान वीस वर्ष असल्याचा दावा केला जातो. फोटोव्होल्टाइक सेल्स तयार करायला काच, अॅल्युमिनियम, तांबे, लीड, प्लॅस्टिक, सिलिकॉन इत्यादी सामुग्री वापरली जाते. जुने झालेले खराब झालेले सौर पीव्ही म्हणजे एक प्रकारचा ई-कचराच होय. डाऊन टू अर्थ या संस्थेच्या अहवालानुसार १०० GWh सौर पीव्ही ७-८ दशलक्ष टन इ-कचरा निर्मिती करतात. या सौर पीव्हीचे रिसाइक्लिंग (पुनर्वापर) आणि विल्हेवाट किचकट आहे. खराब झालेल्या / वापरलेल्या सौर पीव्हींचे तंत्रशुद्ध रीतीने भारतात रिसाइक्लिंग (पुनर्वापर) कसे करता येईल हा एक प्रश्न आहे. त्यामुळे इकोफ्रेंडली सौर पीव्ही व त्याच्या रिसाइक्लिंग बद्दल संशोधन होण्याची आवश्यकता आहे.
*****